George washington carver biography in marathi recipe

कार्व्हर, जॉर्ज वॉशिंग्टन :  ( १८६४ &#; ५ जानेवारी १९४३ ) अमेरिकेच्या मिसूरी राज्यात डायमंड ग्रोव्ह नावाने ओळखल्या जाणाऱ्या वस्तीत लाकडी फळकुटांच्या झोपड्यात जॉर्ज कार्व्हर यांचा जन्म झाला. त्यांचे आई वडील मोझेस कार्व्हर या जर्मन गृहस्थांकडे गुलाम होते. त्या काळी गुलामांच्या जन्म नोंदी ठेवण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे त्यांना जॉर्जना आपल्या वडिलांचे नाव आणि स्वतःचा जन्म दिनांक देखील ठाऊक नव्हता.

बालवयात जॉर्ज अशक्त होते. ताप आणि सर्दी-खोकल्याने ते बेजार असत. त्यामुळे त्यांना घराबाहेर फारसे जाऊ दिले जात नसे. परसदारच्या बागकामात जॉर्ज मदत करत. त्यातून जॉर्जना वनस्पतींची आवड निर्माण झाली. वनस्पती आणि प्राण्यांची चित्रे काढणे, रंगवणे त्यांचा छंद होता. रोपे लावणे, झाडे वाढवणे, पोषक माती तयार करणे अशा शेतकामांत ते निपुण होते. याखेरीज नैसर्गिक कीटकनाशके, कृमीनाशके, कवकनाशके बनवून वापरण्यातील कौशल्यामुळेही लोक त्याना ‘वनस्पतीं’चा डॉक्टर म्हणू लागले. आसपासचे लोक बाल जॉर्जना, स्वतःकडच्या झाडाझुडपांबद्दल सल्ला विचारीत.

त्यांना अमेरिकेतील त्या काळी असलेल्या काळ्या रंगामुळे शाळेत प्रवेश मिळणे अशक्य होते. त्यामुळे जेथे प्रवेश मिळेल तसे भटकत भटकत ते वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत दुसऱ्याची पुस्तके आणि प्रत्यक्ष कृतीतून जमेल तसे शिकत गेले. शिक्षण घेताना  घरगडी, उपाहारगृहातील मदतनीस, धोबी, शेतमजूर म्हणून ते राबले. मिळतील आणि जमतील ती फुटकळ कामे करून मिनेसोटा राज्यातील मिनीआपोलिस शहरात त्यांनी वयाच्या विशीनंतर माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. कृष्णवर्णीय असल्याने महाविद्यालयात प्रवेश मिळण्यात अडचणी आल्या. शेवटी आयोवा राज्यातील राज्य कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्या काळात ते आयोवातील एकमेव ‘काळे’ महाविद्यालयीन विद्यार्थी होते.

वनस्पतीशास्त्रातील पदवी मिळेपर्यंत त्यांनी वयाची तिशी ओलांडली. त्यांचा पदवी परीक्षेच्या प्रबंधासाठीचा विषय होता ‘मानवी प्रभावामुळे बदललेल्या वनस्पती’. जॉर्ज यांनी चिकाटीने प्रा. लुईस पाम्मेल यांचे मार्गदर्शन घेऊन वनस्पती विकृतीशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळविली.

बुकर टी. वॉशिंग्टन या कृष्णवर्णीय शिक्षणतज्ज्ञांनी अलाबामा राज्यात ‘टस्कगी नॉर्मल अँड इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली होती. या संस्थेचे नाव ‘टस्कगी युनिव्हर्सिटी’ असे नंतर करण्यात आले. या संस्थेत कृष्णवर्णीय युवक, युवतींनी शिक्षण आणि व्यावहारिक कौशल्ये या गुणांच्या जोरावर दीर्घकाळ टिकेल अशी प्रगती करावी यावर बुकर यांचा भर होता.

टस्कगी येथे बुकर यांना नव्याने कृषिविभाग सुरू करायचा होता. बुकर यांच्या विनंतीला मान देऊन जॉर्ज यांनी कृषि संचालक पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी ते आयोवामधून अलाबामा येथे आले. पुढील आयुष्यात इतर अनेक प्रस्ताव नाकारून जॉर्ज शेवटपर्यंत टस्कगी युनिव्हर्सिटीतच राहिले. आयुष्यातील सत्तेचाळीस वर्षे त्यानी टस्कगी विद्यापीठात भुईमूग, रताळी आणि सोयाबीन या पिकांवर संशोधन केले .

जॉर्जनी प्रायोगिक शेतात, मातीत सुधारणा केल्या. अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी, मॉरीस जेसप या देणगीदाराने दिलेल्या ‘जेसप वॅगन’ या बैलगाडीसारख्या वाहनातून जॉर्ज घरोघरी जात.

भुईमूग (शेंगदाणा) संशोधन करता करता त्यांनी भुईमूग, रताळी आणि सोयाबीन पासून सहज करता येतील असे पदार्थ बनवण्यास सुरुवात केली. त्यामुळे या पिकांची मागणी वाढली. मेक्सिकोजवळ असलेल्या अमेरिकेच्या दक्षिणेकडील &#; अलाबामा, मिसिसिपीसारख्या राज्यांतील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊ लागला. या राज्यांतून  वर्षानुवर्षे कापूस हे एकच पीक घेतले गेल्यामुळे जमिनीचा कस कमी झाला होता. अलाबामातील जमीन भुईमूग व रताळी या पिकांसाठी फार पोषक आहे असे जॉर्ज कार्व्हर यांच्या लक्षात आले. शेंगदाणे, सोयाबीन अशी द्विदल पिके घेण्याचे त्यांनी सुचवले. बोंड भुंग्याच्या (Anthonomus grandis) प्रादुर्भावामुळे कपाशीच्या पिकाचे उत्पन्न कमी होत असे. त्यामुळेही शेतकरी शेंगदाणे, रताळी आणि सोयाबीन पिकांकडे वळले. भुईमूग आणि सोयाबीनची शेंगधारी वनस्पतींची पिके जमिनीत नायट्रोजनी संयुगांची भर घालू लागली. जमिनीचा कस सुधारला. पीक बदलाचे प्रारंभी फायदे झाले तरी भुईमूग व रताळी यांना फार मागणी नव्हती. शेतकरी पुन्हा कापूस या पारंपारिक पिकाकडे वळू नये म्हणून त्यांनी प्रयोग करून शेंगदाण्यापासून तब्बल तीनशे विविध पदार्थ त्यांनी करून दाखवले जसे चीज, दूध, कॉफी, पीठ, शाई, रंग, साबण, औषधी तेले, लाकडी वस्तूंना लावण्याचे रोगण, सौंदर्य प्रसाधने इत्यादी. तसेच रताळ्यापासून पीठ, व्हिनेगर, काकवीसारखा रस, रबर, शाई, टपाल तिकिटे डकवण्याचा गोंद असे ११८ पदार्थ बनवता येतात हे दाखवून दिले.

कार्व्हर यांच्या प्रयत्नांमुळे १८९६ मध्ये नगण्य प्रमाणात पिकणारा शेंगदाणा पुढील चार-पाच दशकात संपूर्ण अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाचे पीक ठरला. तसेच अमेरिकेच्या दक्षिणेतील राज्यांमधील दुसऱ्या क्रमांकाचे पीक झाला. जॉर्ज यांचे शेंगदाणा उत्पादक संघटना सभेतील भाषण गाजले. तसेच अमेरिकन सरकारने एकदा पुरेसे उत्पादन झाल्यावर चीनमधून आयात होणाऱ्या शेंगदाण्यावर निर्बंध आणले.

दुसऱ्या महायुद्ध काळात जॉर्ज यांनी अमेरिकन वस्त्रोद्योगासाठी सुमारे पाचशे रंजके (रंग) बनवले. परिणामी यूरोपमधून रंग आयातीचे परकीय चलन वाचू लागले.

सौम्य व्यक्तिमत्वाच्या, मितभाषी, निगर्वी, जॉर्ज टीकाकारांकडे लक्ष न देता सतत संशोधन करीत राहिले. त्यांनी टीकाकारांना कृतीनेच उत्तर दिले.

जॉर्जनी स्वतःच्या आयुष्यातील सारी शिल्लक टस्कगीतील कार्व्हर रिसर्च फाउंडेशनला कृषी संशोधनासाठी दान केली.

कार्व्हर उतार वयात घरातच पायऱ्यांवर घसरून बेशुद्धावस्थेत पडलेले सापडले. या अपघातातून ते सावरले नाहीत. थोड्याच दिवसात त्यांचा टस्कगी, अलाबामा येथे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी कार्व्हर, यांचे एक राष्ट्रीय स्मारक असावे असे विधेयक संमत केले. अमेरिकेच्या इतिहासात त्याआधी असा सन्मान केवळ जॉर्ज वॉशिंग्टन आणि अब्राहम लिंकन या दोन राष्ट्राध्यक्षांना मिळाला होता. मिसुरी राज्यातील एकेकाळी मोझेस कार्व्हर (ज्या जर्मन मालकाचे गुलाम कार्व्हर यांचे आईवडील होते) यांच्या मालकीच्या दोनशे दहा एकर जमिनीवर, हे भव्य स्मारक उभे आहे. त्यात संग्रहालय आणि जॉर्जनी काढली, रंगवलेली चित्रे आहेत.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा

Tags: अध्यापक,शेंगदाणे कृषिवैज्ञानिक